शेकडो वर्षांपासून आपल्या भारतामध्ये ग्रहणविषयी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत आणि मनात त्या इतक्या खोलवर रुजून बसलेत आणि बसवलेत की सामान्य माणसाला त्यातून बाहेर पडणे अवघड होवून बसलय. माणूस शिकला, ग्रहणाचे विज्ञान समजू लागला पण "कळतय पण वळत नाही " हीच त्याची अवस्था. तळपत्या उन्हात झाडाच्या गर्द सावलीत बसायला कुणाला नाही आवडणार ? झाडामुळे सूर्यप्रकाश अडवला जातो आणि आपणाला गार सावली मिळते. अगदी हेच सूर्यग्रहणाच्या बाबतीत सुद्धा होते. एथे फक्त झाडाच्या ऐवजी चंद्र आहे बाकी सगळं सारखच. येणारा सूर्यप्रकाश चंद्रामुळे अडवला जातो आणि त्याची सावली पृथ्वीवर पडते, यालाच आपण सूर्यग्रहण म्हणतो.
ग्रहण म्हणजे काय ?
जेंव्हा एक खगोलीय वस्तु दुसर्या खगोलीय वस्तूच्या आड येते तेंव्हा ती झाकली जाते किंवा दिसेनाशी होते यालाच ग्रहण असे म्हटले जाते. साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर ग्रहण म्हणजे फक्त आणि फक्त सावल्यांचा खेळ. (आपण पृथ्वीवर आहोत आणि पृथ्वीवरून अवकाशात पहिले असता ज्या ज्या गोष्टी दिसतात त्यांना खगोलीय गोष्टी अथवा खगोलीय वस्तु असे म्हणतात. उदा. चंद्र, ग्रह, तारे इत्यादी)
ग्रहणाचे प्रकार:
1) सूर्यग्रहण
2) चंद्रग्रहण
ग्रहण हे दोन प्रकारचे असते, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. ग्रहण होण्यासाठी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तिन्ही एका सरळ रेषेत यावे लागतात. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्यग्रहण होते. पृथ्वीच्या ज्या भागांवर चंद्राची सावली पडते अशाच भागांवरून सूर्यग्रहण दिसते. जशी सावली पुढे पुढे सरकत जाते तसे संबंधित भागांवर त्या त्या वेळी सूर्यग्रहण दिसते. अशी अवस्था अमावास्येला असते.
जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण होते. अशी अवस्था पोर्णिमेला असते. मात्र, प्रत्येक अमावास्येला आणि प्रत्येक पोर्णिमेला ग्रहण होत नाही. याचे कारण असे की, पृथ्वी सूर्याभोवती ज्या प्रतलात फिरते ते प्रतल आणि चंद्र पृथ्वीभोवती ज्या प्रतलात फिरतो ते प्रतल समांतर नसून थोडे कललेले आहे. या दोन प्रतलांमध्ये 5 अंशाचा कोन आहे. पोर्णिमेला किंवा अमावास्येला हे तिन्ही खगोलीय गोल एका रेषेत असतात आणि जेंव्हा त्यांची प्रतले समांतर असतात तेंव्हाच ग्रहणे होतात.
( जेंव्हा एखादा ग्रह पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्ये येतो तेंव्हा पूर्ण सूर्यबिंब न झाकता त्याचा थोडासाच भाग झाकला जातो तेंव्हा त्याला ग्रहण न म्हणता "अधिक्रमण" असे म्हणतात ).
सूर्यग्रहणाचे प्रकार :
1) खग्रास सूर्यग्रहण:
खग्रास सूर्यग्रहण म्हणजे संपूर्ण सूर्याबिंब झाकले जाणे. जेंव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेंव्हा त्याची सावली पृथ्वीवर पडते. ही सावली दोन प्रकारची असते. गडद सावली आणि विरळ सावली. पृथ्वीच्या ज्या भागावर गडद सावली असते फक्त त्या भागातील लोकच खग्रास सूर्यग्रहण पाहू शकतात. पृथ्वीच्या फिरण्यामुळे ती सावली जशी पुढे सरकत जाते तसे खग्रास ग्रहणाचे ठिकाण सुद्धा बदलत जाते.
2) खंडग्रास सूर्यग्रहण:
या प्रकारात पूर्ण सूर्यबिंब न झाकता काहीच भाग झाकला जातो. पृथ्वीवर ज्या ठिकाणी चंद्राची विरळ सावली पडते तेथील लोक खंडग्रास सूर्यग्रहण पाहू शकतात.
3) कंकणाकृती सूर्यग्रहण:
या प्रकारात पूर्ण सूर्यबिंब झाकले जाते मात्र भोवतालची कडा प्रकाशमान राहते. त्यामुळे हे एखाद्या कंकणाप्रमाणे दिसते म्हणून याचे नाव कंकणाकृती सूर्यग्रहण असे आहे. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरतो. त्यामुळे त्याचे अंतर कधी कमी तर कधी जास्त असते. जेंव्हा हे अंतर जास्त असेल आणि सूर्यग्रहण झाले तर अश्या प्रकारचा योग येतो. चंद्र जरी आकाराने सूर्यापेक्षा हजारो पटीने लहान असला तरी तो पृथ्वीपासून अश्या अंतरावर आहे की, त्याच्यामुळे सूर्यबिंब बरोबर झाकू शकते. हेच अंतर थोडे वाढले तर चंद्राचे कोनीय माप हे सूर्यापेक्षा लहान होते आणि त्याला पूर्ण सूर्यबिंब झाकणे अशक्य होते.
सूर्यग्रहण कसे पहावे ?
सूर्यग्रहणावेळी तसेच इतर वेळी सूर्याकडे थेट उघड्या डोळ्यांनी पाहणे हे हानिकारक असते. त्यामुळे आपल्या डोळ्यांना कायमची इजा होवू शकते. कदाचित अंधत्व येवू शकते. इतर दिवशी सूर्याकडे कुणी पाहत नाही त्यामुळे तो प्रश्न उद्भवत नाही मात्र, सूर्यग्रहणावेळी उत्सुकतेपोटी सूर्याकडे पाहण्याची इच्छा होते. अश्या वेळी ग्रहणाचे चष्मे लावून किंवा आरसा वापरून सूर्याचे प्रतिबिंब भिंतिवार किंवा पडद्यावर पडून पाहणे जास्त सुरक्षित आहे.
ग्रहणाबाबतच्या अंधश्रद्धा :
ग्रहणाच्या बाबतीत अनेक अंधश्रद्धा जोडल्या गेल्या आहेत. खरेतर या सगळ्या फक्त अंधश्रद्धा आहेत. सूर्यग्रहणाचा आपल्यावर काहीही अनिष्ट परिणाम होत नाही. ती फक्त सावली असते बाकी काही नाही. ग्रहणामुळे दुषित झालेले उघडे अन्न, पाणी फेकून द्यावे असे काहीजण आग्रहाने सांगतात. मग पृथ्वीवर जी पाण्याची ठिकाणे आहेत उदा. नदी, विहीर, तलाव यातील पाणी दूषित होत नाही काय ? की फक्त घागरीतील पाणी दूषित होते ? तेंव्हा आधी दूषित झालेले मन जर साफ केले तर या सगळ्या प्रकारांची काहीच आवश्यकता भासणार नाही आणि भीतीही राहणार नाही. काहीजण सांगतात की ग्रहणा दरम्यान भोजन करू नये. यातही काही तथ्य नाही. आम्ही कित्येक वेळेस असे केले आहे.
तेंव्हा कुठल्याही प्रकारचा आकस आणि भीती मनात न बाळगता ही खगोलीय घटना फक्त खगोलीय घटना म्हणूनच पाहिली पाहीजे.
"जेंव्हा प्रत्येकजण ग्रहणाला एका वैज्ञानिक दुष्टिकोणातून एक खगोलीय घटना म्हणून पाहेल आणि त्याचा मनसोक्त आनंद घेईल तेंव्हा भारतीय माणसांच्या मनाला लागलेल अंधश्रद्धेच ग्रहण नक्की सुटेल आणि तेंव्हा भारत खरोखरच महासत्ता झालेला असेल."
(फोटो स्त्रोत: गुगल)
"जेंव्हा प्रत्येकजण ग्रहणाला एका वैज्ञानिक दुष्टिकोणातून एक खगोलीय घटना म्हणून पाहेल आणि त्याचा मनसोक्त आनंद घेईल तेंव्हा भारतीय माणसांच्या मनाला लागलेल अंधश्रद्धेच ग्रहण नक्की सुटेल आणि तेंव्हा भारत खरोखरच महासत्ता झालेला असेल."
© प्रा. डॉ. अविराज जत्राटकर
संस्थापक, अध्यक्ष - Astronomical Society of Stargazing and Instrumentation (ASSI)


No comments:
Post a Comment